शिरूरमधील बालगृहात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; करणाऱ्या बाले पिता पुत्राला १० वर्षांची सक्तमजुरी शिक्षा
शिरूर प्रतिनिधी
शिरूर येथील मुलींच्या शासकीय कनिष्ठ व वरिष्ठ बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तेथील कनिष्ठ लिपिक बाले व त्याच्या मुलाला पुणे सत्र न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
कनिष्ठ लिपिक शब्बीर बाले याचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मीनाक्षी रेवणसिद्ध बिराजदार यांनी फिर्याद दाखल केली होती. आरोपी शब्बीर अब्दुल बाले (वय ५२) व त्याचा मुलगा बबलू उर्फ अमीर शब्बीर बाले (वय ३१, रा. शिरूर) यांच्याविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) व भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नोव्हेंबर २०१३ ते जून २०१४ या कालावधीत बालगृहातील दोन अल्पवयीन मुलींना कर्मचारी निवासस्थानात बोलावून वेळोवेळी अत्याचार करण्यात आला होता. या कृत्याबाबत कुणाला सांगितल्यास “स्वप्नात येऊन मारून टाकीन” अशी धमकीही आरोपींनी दिली होती. पीडित मुली पुढे केडगाव येथील पंडिता रमाबाई मुक्ती मिशन येथे हलवण्यात आल्यावर त्यांनी तेथील अधीक्षकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर १८ जुलै २०१४ रोजी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
न्यायालयात फिर्यादी, पीडित मुली, साक्षीदार आणि तपास अधिकाऱ्यांच्या साक्षींवरून गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश ए.एस. वाघमारे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. न्यायालयाने भारतीय दंड संहितेनुसार १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड (न भरल्यास १ महिना अतिरिक्त शिक्षा), तसेच POCSO कायद्यानुसार १० वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. ही दोन्ही शिक्षा एकत्रितपणे भोगावयाची आहे. दरम्यान, खटला सुरू असतानाच कनिष्ठ लिपिक शब्बीर बाले याचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व सुवर्णा हुलवान यांनी केला. सरकारी वकील म्हणून मारुती वाडेकर यांनी काम पाहिले. त्यांना शिरूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व इतर न्यायालयीन कर्मचार्यांचे सहकार्य लाभले.
हा गुन्हा घडल्यानंतर शिरूर येथील यशस्विनी महिला संघटनेच्या दीपाली शेळके, नम्रता, गवारी, शशिकला काळे, शिवसेनेच्या संगीता शिंदे व महिला संघटनांनी मोठे आंदोलन पुकारले होते. त्याला आज आरोपींना शिक्षा मिळाल्याने यश आले आहे.