मलठणमध्ये भीषण अपघात 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक अपघातस्थळावरून फरार
शिरूर तालुक्यातील मलठण-शिंदेवाडी परिसरात सोमवारी रात्री घडलेल्याटेम्पो ने दुचाकीला धडक देऊन झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय गणेश रामदास शितकल या तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर आरोपी टेम्पो चालक घटनास्थळावरून पळून गेला असून शिरूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.ही दुर्घटना २२ एप्रिल रोजी रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश शितकल (रा. कवठे येमाई) हा त्याच्या ताब्यातील बजाज पल्सर (MH 12-LZ-6806) या दुचाकीवरून मलठणकडे जात असताना समोरून येणाऱ्या महिंद्रा सुप्रो टेंपो (MH 16-CD-6852) ने भरधाव वेगाने चुकीच्या बाजूने येत जोरदार धडक दिली. या धडकेत गणेशला गंभीर दुखापत झाली व त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर आरोपी टेम्पोचालक कोणतीही मदत न करता वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. या प्रकरणी गणेशचे काका कैलास बबन कुलके (वय ३५, रा. कवठे येमाई) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या प्रकरणाचा तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी बनकर हे करीत आहेत.