स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कामगिरी
शिक्रापूर ता. शिरुर येथे एका रात्रीत आठ मेडिकल दुकानाचे शटर उचटून चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या तिघा चोरट्यांच्या टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली असून यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. एकाच वेळी आठ मेडिकल दुकाने फोडून चोरांनी पोलिसांनाच आव्हान दिले होते.
मेडिकल दुकानात चोरी करणारे चोरटे अटक झाल्याने शिक्रापूर परिसरातील हॉस्पिटलचे डॉक्टर व मेडिकल दुकानदार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाचे अभिनंदन केले आहे.
यलाप्पा परशुराम सुतार (वय २१ वर्षे रा. नेहरूनगर चिंचवड पुणे )व संदीप शंकर सोनार (वय १८ वर्षे रा. वल्लभनगर चिंचवड पुणे) या दोघासह एका अल्पवयीन युवकाला ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शिक्रापूर ता. शिरुर येथे १० फेब्रुवारी २०२५ रोजी अनेक मेडिकल चालक मेडिकल बंद करुन घरी गेले असताना दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास शिक्रापूर तळेगाव रोड येथील रमेश मेडिकल, कल्याणी मेडिकल, मातोश्री मेडिकल, श्री स्वामी समर्थ मेडिकल, मलठण फाटा येथील साई मेडिको, न्यू श्रेया मेडिकल, आराध्या मेडिकल तर हिवरे रोड येथील प्रकाश मेडिकल असे आठ मेडिकल चोरट्यांनी फोडून प्रत्येक मेडिकल मधील काही रोख रक्कम चोरी केली सदर घटना काही सीसीटीव्ही मध्ये कैद झाली तर याबाबत तेजस प्रमोद गायकवाड (वय २५ वर्षे रा. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला होता,
एका रात्रीत आठ मेडिकल दुकान फोडून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले होते. याची गंभीर दखल घेत सदर गुन्ह्याचा तपास करत असताना यातील आरोपी पिंपळे जगताप येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना मिळाली त्यांनतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्ताजी मोहिते, पोलीस फौजदार तुषार पंदारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, सागर धुमाळ यांनी पिंपळे जगताप येथे सापळा रचत यलाप्पा परशुराम सुतार , संदीप शंकर सोनार या दोघांसह एका अल्पवयीन युवकाला याब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली असल्याने दोघांना अटक करत पुढील तपासासाठी शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व प्रताप जगताप हे करत आहे.