इनामगाव ता. शिरूर येथे हनुमानवाडी येथे लावलेल्या पिंजऱ्यात आज सकाळी बिबटया जेरबंद झाला आहे.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ही पकडलेला बिबट्या मादी असून त्याचे अंदाजे तीन वर्षे वयाची आहे.
तीनच दिवसापूर्वी इनामगाव येथे बिबट्याची तीन पिल्ले सापडली होती. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागातील बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती.
इनामगाव परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याने सात ते आठ दिवसांपूर्वी शिरूर वन विभागाच्या वतीने या ठिकाणी चार पिंजरे लावले होते. यातील हनुमानवाडी येथे लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज सकाळी बिबट्या जेरबंद झाला आहे. या बिबट्याला वन विभागाच्या वतीने माणिक डोह बिबट्या निवारण केंद्रामध्ये सोडण्यात आले आहे.
शिरूर तालुक्यातील पूर्व भागात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असून सध्या ऊस तोडणी सुरू असल्याने बिबट्यांना लपण्याच्या जागा कमी होत आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे लहान मुले,शेतात कामासाठी जाणारे महिला पुरुष शेतमजूर, ऊस तोडणी कामगार यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.
शिरूर तालुक्यात पूर्व भागात बिबट्यांची संख्या पाहता इनामगाव, पिंपळसूटी, मांडवगण फराटा, वडगाव रासाई, तांदळी या परिसरात नरभक्ष बिबट्याही आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. असे आवाहन वनपाल भानुदास शिंदे यांनी केले आहे.