दोघेही पुढील पाच वर्षांसाठी सहकारात अपात्र
( प्रतिनिधी ) शिरुर तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते व घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे व शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांना पुढील पाच वर्षे सहकारातील कुठलीही निवडणूक लढता येणार नाही, स्विकृत सदस्य म्हणून कुठल्याही संस्थेवर नामनिर्देशित होता येणार नाही. शरद बॅंकेचे अनुक्रमे १८ व १४ लाखांच्या कर्जासाठीचे ते थकबाकीदार राहिल्याने त्यांना सन २०२१ मध्ये विभागिय सहनिबंधकांनी सहकारातील निवडणूकांसाठी अपात्र ठरविले होते. तोच आदेश उच्च न्यायालयाने नुकताच कायम ठेवला. पर्यायाने शिरुर तालुक्यातील राजकारण हालविणारे दोन नेते सहकारातील निवडणूकीसाठी जायबंदी झाले असे म्हणता येणार आहे.
शिरुर तालुका भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते व घोडगंगा सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे व शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष सुधीर फराटे हे सन २०१८ च्या सुमारास मांडवगण फराटा विविध विकास सोसायटीच्या संचालकपदी कार्यरत असलेले होते, त्याकाळी शरद बॅंकेचे तसेच मांडवगण सोसायटीचे अनुक्रमे रुपये १८ लाख ७३ हजार १६३ रुपये व १४ लाख ७ हजार ७४८ एवढ्या रकमेचे थकबाकीदार असल्याने त्यांचे संचालकपद रद्द करावे म्हणून त्याच संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष महादेव किसनराव फराटे व उपाध्यक्ष राजाराम विश्वनाथ शितोळे यांनी शिरुर सहायक निबंधक यांचेकडे तक्रार व मागणी दाखल केली. त्यानुसार या प्रकरणाची सुनावणी होवून निकाल दादा पाटील व सुधीर फराटे यांच्या बाजुने लागला. यावर महादेव फराटे व राजाराम शितोळे यांनी पुण्यातील विभागिय सहनिबंधक संगीता डोंगरे यांचेकडे निकालाविरोधात दाद मागितली. त्यानुसार ४ मार्च २०२१ रोजी त्यांनी सुधीर व दादा पाटील फराटे यांना पुढील पाच वर्षांसाठी सहकारातील विविध निवडणूकांसाठी अपात्र ठरविले. मात्र या निकालाविरोधात या दोघांनी पुढे थेट मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली व त्याची सुनावणी पूर्ण होवून नुकताच निकाल लागला. सदर निकालानुसार राष्ट्रवादीचे नेते तथा घोडगंगा सहकारी बॅंकेचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे व शिवसेनेचे तालुकाध्यक्ष सुधीर फराटे यांची पुढील पाच वर्षांसाठीची अपात्रता कायम ठेवत विभागिय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी दिलेला निकाल कायम ठेवला. पर्यायाने दोघांसाठीही पुढील पाच वर्षांसाठी सहकारातील निवडणूकांचा मार्ग बंद झाला असे म्हणता येणार आहे. अर्थात उच्च न्यायालयाच्या निकालात ही पाच वर्षे विभागिय सहनिबंधक संगीता डोंगरे यांनी दिलेल्या ४ मार्च २०२१ रोजीच्या निकालापासून पुढे की, २४ जानेवारी रोजी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या निकालापासुन पुढील पाच वर्षे हे स्पष्ट केलेले नसल्याने याबाबत नेमकी स्पष्टता नाही.
स्वतंत्र चौकट १ -
कालबाह्य निकाल आणि केवळ सोसायटीपूरता - सुधीर फराटे ( माजी तालुकाध्यक्ष, शिवसेना )
सन २०२१ मध्ये तत्कालीन विभागिय सहनिबंधकांच्या निकालाविरोधात मी, दादा पाटील फराटे व इतर दोन संचालक आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. मात्र पुढील काळात हे प्रकरण तथ्यहीन झाल्याने आम्ही न्यायालयात आमची बाजुच मांडत बसलो नाही. त्यामुळे एकतर्फी निकाल लागला. दरम्यान आम्ही सन २०२१ मध्ये संबंधितांच्या तक्रारीवेळी कुठेही थकबाकीदार राहिलो नव्हतो. सोसायटीचे सन २०२१ चे संचालक मंडळही आता राहिले नसून आम्ही दोघेही मांडवगण सोसायटीचे संचालक आता नाही. उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निकालात सहकारातील इतर निवडणूकांचा उल्लेख नाही. पर्यायाने हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असून योग्य वेळी पत्रकार परिषद घेवून यामागील राजकारणाचाही आम्ही दोघेही पर्दाफाश करणार आहोत.
स्वतंत्र चौकट २ -
शिरुरच्या राजकारणावर मोठे परिणाम करणारा निकाल
दादा पाटील हे विधानसभेवेळी राष्ट्रवादीसोबत गेले तर सुधीर फराटेंनीही आमदार माऊली कटके यांचेसाठी प्रचंड मेहनत घेतली. मात्र येवू घातलेल्या शिरुर बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमिवर हा निकाल शिरुरमधील राजकारणावर मोठा परिणाम करणारा ठरणार आहे. अर्थात घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्या हालचालीही सध्या वेगात आहेत. कारखान्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असलेल्या निर्णयावरही वरील निकालाचा परिणाम होण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
सन २०२१ मध्ये तत्कालीन विभागीय सहनिबंधकांच्या
निकालाविरोधात मी, दादा पाटील फराटे व इतर दोन संचालक आम्ही उच्च न्यायालयात गेलो होतो. मात्र, पुढील काळात हे प्रकरण तथ्यहीन झाल्याने आम्ही न्यायालयात आमची बाजूच मांडत बसलो नाही. त्यामुळे एकतर्फी निकाल लागला. दरम्यान आम्ही सन २०२१ मध्ये संबंधितांच्या तक्रारीवेळी कुठेही थकबाकीदार राहिलो नव्हतो. सोसायटीचे सन २०२१ चे संचालक मंडळही आता राहिले नसून, आम्ही दोघेही मांडवगण सोसायटीचे संचालक आता नाही. उच्च न्यायालयाच्या कुठल्याही निकालात सहकारातील इतर निवडणुकांचा उल्लेख नाही. पर्यायाने हा शिळ्या कढीला ऊत आणण्याचा प्रकार असून योग्य वेळी यामागील राजकारणाचाही आम्ही दोघेही पर्दाफाश करणार आहोत.
- सुधीर फराटे, माजी तालुकाप्रमुख, शिवसेना शिरूर
सोबत - दादापाटील फराटे व सुधीर फराटे फोटो.