शास्ताबाद (ता.शिरूर) येथील शेतात असणाऱ्या शेळ्या, मेंढ्यांच्या वाड्यात पहाटेच्या सुमारास बिबट्याने प्रवेश करत हल्ला चढवला. या हल्ल्यात लहान मोठ्या १५ शेळ्या-मेंढ्या या हल्ल्यात ठार, तर ५ जखमी झाल्या आहेत तर निमगावदुडे गावात बिबट्याच्या हल्ल्यात घोडा ठार झाला आहे. यामुळे शेतकरी पशुधनावर होणारे बिबट्याचे सततचे हल्ले यामुळे संतप्त झाला आहे. माणसे आणि जनावरे दोन्ही असुरक्षित झाले असून आता या बिबट्यांची करायचे काय हा प्रश्न सर्वांच्या पुढे निर्माण झाला आहे.
शास्ताबाद (ता.शिरूर) येथे शेतकरी चंद्रकांत गोरडे यांचा शेळ्या मेंढ्याचा वाडा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते पशुपालन व्यवसाय करतात. शेतात त्यांनी शेळ्या मेंढ्या साठी मोठी जाळी तयार केली आहे. त्यांनी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे जाळी बंद केली व शेतातून घरी परतले. दरम्यान, पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाळीच्या आत प्रवेश करून शेळ्या मेंढ्यावर हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने लहान मोठ्या १५ शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला. तर, ५ शेळ्या जखमी केल्या. शेतकरी चंद्रकांत गोरडे हे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतात गेले असता, सदर प्रकार उघडकीस आला. या घटनेत त्यांचे जवळपास २ लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जखमी शेळ्यांना गंभीर इजा झाली असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती वनविभागाला दिल्या नंतर वनरक्षक गणेश पवार, वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला.
तसेच निमगाव दुडे तालुका शिरूर येथे राहुल घुले यांनी त्यांची घोडा घराबाहेर बांधला असताना रात्रीच्या वेळेस बिबट्याने हल्ला केला असता या हल्यात घोडी ठार झाली आहे.
या घटनेमुळे परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.