दुचाकीवरील इसमा वडील व दोघा लहानग्या मुलांचा जागीच मृत्यू
मुलाला शाळेत सोडायला दुचाकी चालकावर काळाचा घाला
पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर विजय लॉजेस्टिक समोर दारूच्या नशेत असणाऱ्या टेम्पो चालकाने चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात बाप व दोन मुलांचा असा एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे
यामुळे शिक्रापूर व पिंपळे जगताप परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली असून, या रस्त्यावर नेहमीच होणारे अपघात टाळण्यासाठी गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
या अपघातात गणेश संजय खेडकर (वय ३५ वर्षे), तम्नय गणेश खेडकर (वय ९ वर्षे )व शिवम गणेश खेडकर (वय ५ वर्षे तिघे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे )या तिघांचा मृत्यू झाला आहे.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर जीवन रणखंब (वय ३५ वर्षे रा. सोनेगाव ता. उस्मानाबाद जि. उस्मानाबाद )या मद्यपी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावरुन गणेश खेडकर हा त्याच्या त्याच्या तिसरी शिकणाऱ्या तन्मय नावाच्या मुलाचा जादा तास असल्याने शाळेमध्ये सोडवण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच १२ आर डब्ल्यू २१४६ या दुचाकीहून चाललेला असताना शिक्रापूर बाजूकडून भरधाव वेगाने आलेल्या व चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणारा टेम्पो क्रमांक एम एच १३ ए एक्स ३७३२ या टेम्पोची खेडकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसून अपघात होऊन टेम्पो रस्त्याचे कडेला उलटला यावेळी झालेल्या अपघातात गणेश सह त्याची तन्मय व शिवम दोन्ही मुले गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले, यावेळी तीनही जणांचा उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे, पोलीस हवालदार आत्माराम तळोले, राजेश माने, राहूल वाघमोडे, उद्धव भालेराव, राम जाधव यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले, दरम्यान जखमींना उपचारासाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी गणेश खेडकर व त्याची दोन मुले तम्नय व शिवम या तिघांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले, तर टेम्पो चालक याने दारू पिण्याचे वैद्यकीय अहवालात आढळले आहे.
याबाबत कुणाल मनोहर खेडकर वय २७ वर्षे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी ज्ञानेश्वर जीवन रणखंब या मद्यपी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे हे करत आहे.
फोटो खालील ओळ – पिंपळे जगताप ता. शिरुर येथील शिक्रापूर रस्त्यावरील अपघातात वाहनांची झालेली दुरवस्था.