तालुक्यातील शिक्रापूर येथे वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाने थांबण्याचा इशारा केला असताना देखील भरधाव वेगाने थार कार पोलिसाच्या अंगावर घालण्याचा प्रकार घडला. घटनेत पोलिसाच्या पायावरून कारचे चाक गेल्याने पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. C. याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किरण जालिंदर बवले (वय २७, रा. वडगाव घेनंद, ता. खेड) या कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस शिपाई ज्ञानदेव बाळासाहेब सोनवणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
शिक्रापूर येथील पाबळ चौक परिसरात पोलीस शिपाई ज्ञानदेव सोनवणे हे वाहतूक नियमनाचे काम करीत होते. पुणे बाजूने विरुद्ध दिशेने एक काळ्या काचा व फॅन्सी नंबर असलेली थार कार आली. दरम्यान, पोलिसांनी त्या कार चालकाला थांबण्याच्या इशारा केला. चालकाने भरधाव वेगाने कार सोनवणे यांच्या अंगावर घातली. मात्र , सोनवणे प्रसंगावधान राखून मागे सरकल्याने ते बाजूला पडले. यावेळी कारचे चाक त्यांच्या पायावरून गेल्याने ते जखमी झाले. यावेळी कार चालकाने काच खाली घेऊन पुढे आला तर जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.
दरम्यान, शेजारील नागरिक व पोलिसांनी कार चालकाला थांबवत त्याची थार कार ताब्यात घेत पोलीस स्टेशन येथे आणले. याबाबत पोलीस शिपाई ज्ञानदेव बाळासाहेब सोनवणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. बवले याला अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय मस्कर हे करीत आहेत.