शिरुर तालुक्यातील नागरगाव येथील भीमा नदीच्या बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांचे तब्बल १३ विद्युत पंप चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबविले आहेत. शिरूर तालुक्यात गेले अनेक महिन्यापासून विद्युत रोहित्र, विद्युत पंप व केबल चोरून जाण्याचे प्रकार वाढले आहेत.
शिरूर तालुक्यात रोहित्र चोरीनंतर आता विद्युत मोटार चोर सक्रिय झाले आहे यांचा बंदोबस्त करणे शिरूर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे.
त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. या चोरट्यांचा पोलिसांनी त्वरित छडा लावावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
सुभाष सीताराम शितोळे यांनी याबाबत शिरूर पोलिस स्टेशन अंतर्गत मांडवगण फराटा आऊट पोस्टमध्ये फिर्याद दाखल केली आहे. गावातील इतर व्यक्तींशी संपर्क साधला असता अनेक शेतकऱ्यांनी आपल्या नदीकाठावरील विद्युत पंप चोरीच्या घटना वारंवार होत असल्याचे सांगितले. पारगाव पुलाजवळील बंधाऱ्याजवळ परिसरातील नागरगाव, आंधळगाव, रांजणगाव सांडस या गावातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी नदीकाठी एकाच ठिकाणी अंदाजे चाळीस, पन्नास विद्युत पंप बसविले आहेत. रात्रीच्यावेळी चोरट्यांनी येथील विद्युत पंपाचे पाइप कापून विद्युत पंप चोरून नेले आहेत. तसेच, दोन पाइप कापलेले विद्युत पंप जागेवरच सोडून चोरट्यांनी पळ काढला.
सुभाष पांढरे, गोपाळ भगवान साठे, सुनील रामदास साठे, शिवाजी किसन शेलार, चौरंगनाथ खंडेराव शेलार, संतोष कुल, ऋषिकेश शितोळे, विभीषण खुळे, भाऊ खुळे, अप्पासाहेब कोंडिबा साठे, सीताराम नलगे, सुभाष शितोळे या शेतकऱ्यांच्या नदीकाठी असणाऱ्या विद्युत पंपाची चोरी झाल्याचे सांगितले आहे.. त्यात शेतकऱ्यांचे अंदाजे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहेत…
शिरूर पोलिस स्टेशनला एक महिन्यापूर्वी नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी पदभार घेतला आहे. दबंग पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. यापूर्वी त्यांनी अनेक कठीण गुन्ह्यांची उकल केली असून, त्यांच्यापुढे आता विद्युत रोहीत्र, विद्युत पंप, केबल या चोऱ्या रोखण्याचे व चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.