लोणीकंद पोलीसांनी गुन्हेगारी टोळीच्या आवळल्या मुसक्या
एन्जॉय ग्रुपचे ७ जण अटकेत ; देशी बनावटीचे एकूण ०७ पिस्टल व २३ जिवंत काडतुसे केले जप्त
वाघोली विशेष प्रतिनीधी
पूर्ववैमनस्यातून विरोधी टोळीतील सदस्याचा कोलवडी मांजरी रोड येथे घातपाताचा रचलेला कट फसल्यानंतर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात लोणीकंद पोलिसांनी एन्जॉय ग्रुपमधील गुन्हेगारी टोळीच्या मुसक्या आवळत सात जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केली आहे. पोलिसांनी ७ पिस्टल व २३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप, सुमित उत्तरेश्वर जाधव, अमीत म्हस्कु अवचरे, ओंकार ऊर्फ मैय्या अशोक जाधव, अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे, राज बसवराज स्वामी, लतिकेश गौतम पौळ असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर रोजी कोलवडी-मांजरी रोड परिसरामध्ये विशाल सातपुते यांचे सहकारी असलेले राजू शेवाळे हे कोर्टाची तारीख असल्याकारणाने गेले असता विरोधी गट व त्यांच्या गटामध्ये रागाने पाहिल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याच रात्री शेवाळे, विशाल सातपुते व इतर सासवड येथील दहीहंडीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना कारचा काही मुले पाठलाग करीत असल्याचे समजले. शेवाळे कार जोरात पळवत असताना सुमित जाधव व एकजण दुचाकी घेऊन रस्त्याच्या कडेला उभा राहून घातपात करणार असल्याचे लक्षात आल्यानंतर कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघेजण खाली पडले आणि अंधारात पळून गेले. शेवाळे त्याठिकाणी परत आले असता त्यांना एक पिस्टल २ जिवंत काडतूस मिळाले. सदर पिस्टल त्यांनी लोणीकंद पोलिसांकडे सुपूर्द करून सुमित जाधव व इतरांविरोधात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल होताच लोणीकंद पोलिसांनी पथके तयार केली आणि सदरचा गुन्हा एन्जॉय ग्रुपच्या सदस्यांनी केल्याचे समजले. हडपसर परिसरात तळ ठोकून माहिती घेतल्यानंतर सदरच्या गुन्ह्यात शुभम ऊर्फ मॅटर जगताप, सुमित जाधव, अमीत अवचरे, ओंकार ऊर्फ मैय्या जाधव, अजय ऊर्फ सागर हेगडे, राज स्वामी, लतिकेश पौळ, रौफ ऊर्फ लाला बागवान यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले. शुभम जगताप व सुमित जाधव यांना मुंढवा परिसरातून तर अमीत अवचरे, सागर हेगडे, ओंकार जाधव, ललिकेश पोळ, राज स्वामी यांना नवले ब्रिज कात्रज परिसरातून ताब्यात घेतले. दरम्यान अमीत अवचरे व सागर हेगडे यांच्या ताब्यातुन देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०९ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. तसेच पोलीस कस्टडी दरम्यान आरोपीतांकडून देशी बनावटीचे ०४ पिस्टल य १२ जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. दाखल गुन्हयाच्या तपासात ७ जणांना अटक करुन त्यांचेकडुन देशी बनावटीचे एकुण ०७ पिस्टल व एकुण २३ जिवंत काडतुसे, गुन्हा करण्यासाठी वापरलेली दोन वाहने, ०७ मोबाईल फोन असा एकुण सव्वा नऊ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील,पोलिस उपायुक्त हिंमत जाधव,सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड,(डीबी)सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांच्या टीम व लोणीकंद पोलिसांनी केली आली.