अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीची दरवर्षीप्रमाणे भाद्रपद द्वारयात्रेला सुरूवात होणार आहे. या यात्रेसाठी देवस्थानच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, या द्वारयात्रेसाठी राज्यभरासह देशभरातून हजारो भाविक येत असतात.
नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री क्षेत्र रांजणगावच्या महागणपतीची ख्याती देशभरात आहे, या द्वारयात्रेचा उत्सव येत्या बुधवारपासून (४ सप्टेंबर) सुरूवात होणार असून हा उत्सव १० सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. महागणपतीची पालखी गणपतीच्या बहिणीना आणण्यासाठी जात असते.
पहिल्या दिवशी पूर्वद्वारकडे असलेल्या करडे गावातील मांजराई देवीकडे पालखीचे प्रस्थान होत असते. पहिल्या दिवशीच्या पालखीचा मान पाचुंदकर आळीला मिळत असतो.
दुसऱ्या दिवशी दक्षिणद्वार असलेल्या निमगाव महाळुंगी येथील आसराई (शिरसाई) देवीकडे पालखीचे प्रस्थान होते, या पालखीचा मान माळी आळीला असतो.
तिसऱ्या दिवशी पश्चिमद्वार असलेल्या गणेगाव खालसा येथील ओझराई देवीकडे पालखीचे प्रस्थान होते, या पालखीचा मान लांडे आळीला मिळत असतो. चौथ्या दिवशी उत्तरद्वार असलेल्या ढोक सांगवी
येथील मुक्ताई देवीकडे पालखीचे प्रस्थान
होते, यादिवशी पालखीचा मान शेळके आळीला मिळत असतो.
या चार दिवसात महागणपतीच्या मूर्तीस स्पर्श करुन दर्शन घेण्याचा लाभ भाविकांना मिळत असतो, त्यानंतर ट्रस्टच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून महिलांसाठी विशेष हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला आहे.
देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्षा स्वाती पाचुंदकर, उपाध्यक्ष संदिप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, खजिनदार विजय देव यांची युध्दपातळीवर तयारी सुरू आहे.
भाविकांचे दर्शन उत्तम व्हावे आणि त्यांना योग्य सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी ट्रस्टसह महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग सज्ज आहे. यात्रा काळात भाविकांनी
मोठ्या संख्येने दर्शनासाठी यावे. - स्वाती पाचुंदकर, अध्यक्ष रांजणगाव गणपती ट्रस्ट