शिरूर ( प्रतिनिधी ) निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील काळे वस्ती येथे पहाटेच्या सुमारास अरुणा काळे या शेतकरी महिलेच्या गोठया शेजारी बांधलेल्या कालवडीचा बिबट्याने फडशा पाडला असल्याची घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले असून येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील काळे वस्ती येथे काळे कुटुंबीय रात्रीच्या सुमारास झोपलेले असता, पहाटेच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा तसेच जनावरांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने काळे कुटुंबीय घरातून बाहेर आले असता त्यांना बिबट्या पळून जाताना दिसला, मात्र यावेळी एक कालवड ठार झालेली होती, याबाबतची माहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमचे शेरखान शेख, शुभम वाघ यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला यावेळी सरपंच बापूसाहेब काळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य नवनाथ भुजबळ, सुर्यकांत काळे, संतोष काळे यांसह आदी उपस्थित होते, तर यावेळी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून लवकरच येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले.
फोटो खालील ओळ – निमगाव म्हाळुंगी येथे बिबट्याने फडशा पाडलेल्या कालवडीचा पंचनामा करताना.