राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी फेरनिवड राज्य सरकारने केली असल्याने आढळराव यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी (ता.२३) गृहनिर्माण विभागाचे सचिव अजित कवडे यांनी शासन निर्णय पारित केला आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रितपणे निर्णय घेऊन शिवाजीराव आढळराव पाटील यांचे नाव जाहीर केले होते. मात्र लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरताना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद हे शासकीय लाभाचे पद असल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.
नियुक्ती बद्दल शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसर्यांदा म्हाडा अध्यक्ष पदाची सोपवलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन. प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू लोकांना घरे उपलब्ध करून देणे. या कामाला मी अग्रक्रम देणार आहे.'
आढळराव पाटील यांची निवड जाहीर झाल्यानंतर शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आढळराव पाटील यांना मोबाईलद्वारे शुभेच्छा नागरिकांकडून दिल्या जात होत्या.
पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती झाल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले की, पुणे म्हाडाचा कार्यभार सांभाळण्यासाठी व येथे काम करण्यास इच्छुक होतो.या पदावर काम करण्याची संधी दिली आहे. या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून 'गरिबांसाठी हक्काचं घर' ही म्हाडाची संकल्पना अधिक वेगाने राबविणार आहे. याशिवाय म्हाडाच्या पुणे प्रादेशिक मंडळातील धोरणात्मक कामे हाती घेणे, कामकाजाचा आढावा घेणे, नवीन प्रकल्पांची उभारणी करणे, कामांची गुणवत्ता व दर्जा सुधारणे, जास्तीत जास्त नागरिकांना घरे निर्मितीचा लाभ मिळवून देणे, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणणे आदी कामे गतिमान पद्धतीने राबविण्यावर माझा भर असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या नागरिकांना घर खरेदी साकारताना आर्थिक लाभ मिळवून देण्याच्या योजनाही कसोशीने राबविण्यात येतील, असा विश्वास यावेळी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे नवनियुक्त अध्यक्ष, माजी खासदर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला.