शिरूर (विशेष प्रतिनिधी)
टाकळी भीमा ता. शिरूर परिसरात नागरिकांना वारंवार निदर्शनास येणारा तसेच पशु धनावर हल्ले करणारा बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असल्याने नागरिक देखील समाधान व्यक्त करत असून परिसरातील अन्य बिबट्यांचा देखील बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहे.
टाकळी भीमा ता. शिरूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या नागरिकांच्या निदर्शनास येत असताना अनेकदा बिबट्याने पशुधनावर हल्ले केले असल्याने येथील बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ करत असताना शिरुर वनविभागाच्या वतीने नुकतेच रमेश साकोरे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आलेला असताना बुधवार ३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आल्याने पिंजऱ्याची पाहणी केली असता पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे दिसून आले, याबाबतची माहिती शिरुर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रताप जगताप यांना मिळताच वनपरीमंडल अधिकारी गौरी हिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियतक्षेत्र अधिकारी प्रमोद पाटील, निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व रेस्क्यू टीम मेंबर शेरखान शेख, अमोल कुसाळकर, सर्पमित्र अमोल डाडर, शुभम वाघ, सुरज वाघमारे, यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता पिंजऱ्यामध्ये अंदाजे अडीच वर्षे वयाचा नर प्रजातीचा बिबट्या असल्याचे दिसले, यावेळी सदर बिबट्याला ताब्यात घेत माणिकडोह बिबट निवारा केंद्रात रवाना करण्यात आले, यावेळी पोलीस पाटील प्रकाश करपे, विशाल पाटोळे, विशाल लोखंडे, तुषार डेरे, उमेश काळे यांसह आदी उपस्थित होते, तर येथील बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून परिसरात अजूनही वावरत असलेले बिबटे जेरबंद करण्याची मागणी नागरिक व ग्रामस्थ करत आहे.
फोटो खालील ओळ – टाकळी भीमा ता. शिरुर येथे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या घेऊन जाताना वनविभागाचे अधिकारी.
सोबत – पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या.