पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई शिरूरमध्ये २१ लाखांच्या एम.डी. ड्रग्जसह शिरूरच्या तिघांना अटक
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर परिसरात एम डी ड्रग (अंमली पदार्थ )विक्री करणाऱ्यांच्या तिघानां पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या व शिरूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने अटक करून त्याच्याकडून ४७.६० ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) हा अंमली पदार्थ आणि दोन चारचाकी वाहने असा एकूण २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ड्रग विक्री प्रकरणातील आका याचा शोध पोलीस घेत असल्याचे सांगितले असून याच्या मुळाशी पोलीस जाणार असले तर ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी विशाल मारूती मोरे (वय २०, रा. बाफना मळा, चंदननगर शिरूर), प्रतीक संतोष लंघे (वय २५, रा. करडे, शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय २६, रा. रामलिंग रोड, सावतामाळी नगर शिरूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी जिल्ह्यात 'नशामुक्त भारत अभियाना'ंतर्गत अंमली पदार्थ विक्री व सेवनाविरोधात कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे १७ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरूर परिसरात गस्तीवर असताना, न्हावरा फाटा ते बाबूरावनगर रोडवरील शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर दोन वाहनांमध्ये काही व्यक्ती ड्रग्ज विक्रीसाठी थांबल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरीत्या या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत विशाल मारूती मोरे (वय २०, रा. शिरूर), प्रतीक संतोष लंघे (वय २५, रा. करडे, शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय २६, रा. शिरूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. झडती दरम्यान त्यांच्याकडे ४७.६० ग्रॅम एम.डी. ड्रग्ज दोन चारचाकी वाहने, दुचाकी असा एकूण २१ लाख ५२ हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींना अंमली पदार्थांचा पुरवठा करण्यासाठी 'पोर्टर' (Porter) या डिलिव्हरी ॲपचा वापर करण्यात आला होता. या ॲपद्वारे ड्रग्जची डिलिव्हरी घेणाऱ्या इतर व्यक्तींचीही चौकशी सुरू असून, त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या रॅकेटमधील मुख्य पुरवठादाराचा शोध पोलीस घेत आहे.
ही कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) सुनील रामलिंग फुलारी, पुणे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, शुभम चव्हाण, पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, सागर नामदास, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अमोल शेडगे, मंगेश भगत, सचिन घाडगे, अजित भुजबळ, राहुल पवार शिरूरचे पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, अंबादास थोरे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण करीत आहे.
एमडी ड्रग विकणाऱ्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली असली तरी हे ड्रग घेणारे यांच्याही रक्तांचे नमुने शिरूर पोलिसांनी घेतले असून यात जर ते अमली पदार्थ घेत असल्याचे पुरावे वैद्यकीय विभागाने दिल्यास यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
संदेश केंजळे,पोलिस निरीक्षक , शिरूर

