शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील मलठण चौकात रस्ता रोको आंदोलन अनियमित कामांवर ग्रामस्थांचा संताप; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

9 Star News
0

 

शिरूर तालुक्यातील अष्टविनायक महामार्गावरील मलठण चौकात रस्ता रोको आंदोलन

अनियमित कामांवर ग्रामस्थांचा संताप; वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा


शिरूर प्रतिनिधी :

अष्टविनायक महामार्गावरील मलठण येथील चौकात रस्त्याच्या कामातील अनियमितता व विविध समस्यांवरून स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. मलठण, सोनेसांगवी, कवठे, वाघाळे तसेच परिसरातील गावांतील नागरिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. महामार्गाच्या कडेला साइड पट्ट्या नसणे, आवश्यक सूचना फलक (बोर्ड) नसणे, तसेच अपूर्ण कामामुळे वारंवार अपघाताचा धोका निर्माण होत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या समस्यांकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग अवलंबला.

आंदोलनामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

दरम्यान, परिसरातील खाण (खनिज) व्यवसायाशी संबंधित उद्योजकांच्या ठेक्यांवर काम करणारे हायवा चालक मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला. अशा चालकांवर तात्काळ कारवाई करून कडक बंदोबस्त करावा, अशी मागणी आंदोलकांनी प्रशासनाकडे केली.

ग्रामस्थांनी लवकरात लवकर रस्त्याच्या कामाची चौकशी करून सुरक्षित व दर्जेदार काम पूर्ण करावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!